
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.१७ ॶॉगस्ट : उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील प्राचीन श्री मार्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी प्रथमच ‘महागंगा पूजा-आरती’चा भव्य धार्मिक सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, श्रावणातील प्रत्येक सोमवारी महागंगा पूजा-आरती होणार आहे.
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी श्री मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात विधिवत पूजा-अर्चना व आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात ‘ॐ नमः शिवाय’ आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यात आले.

शंखनाद, डमरूचा निनाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वैनगंगा तीर दुमदुमला! विधिवत गंगापूजन, दीपप्रज्वलन आणि महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. नदीच्या पवित्र प्रवाहासमोर झालेल्या या दिव्य आरतीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी श्रद्धेने सहभागी होत हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर भक्तिमय करून टाकला.
या ऐतिहासिक सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सहाय्यक सुनील मित्रा, जिल्हाधिकारी अविशांत पंडा,अनिरुद्ध पालकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूरचे आमदार मोहन मते, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, च्या मशीनच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार,बिनाराणी होळी ,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, संतोष भाऊ तंगडपल्लीवार, दिलीप चलाख, संजय बारापात्रे, चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, यश गण्यारपवार यांच्यासह मुरलीधर महाराज, नागपूरे महाराज व परिसरातील महाराज मंडळी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो भाविक उपस्थित होते.
धार्मिक वैभवात मानाचा नवा अध्याय
श्रावणाच्या पवित्र महिन्यात वैनगंगेच्या तीरावर प्रथमच झालेल्या या महागंगा पूजा-आरतीने मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मानाचा नवा अध्याय जोडला आहे. या उपक्रमामुळे मार्कंडेश्वर देवस्थानचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, वैनगंगेच्या पावन तीराला एका नव्या आध्यात्मिक परंपरेची जोड मिळाली आहे. भाविकांसाठी हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय अनुभव ठरला.

