
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मंथन; २०४७ च्या विकास आराखड्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली : आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ या संकल्पनेला दिशा देण्यासाठी १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचा १७ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात थाटात समारोप झाला. जिल्ह्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाबाबत मौलिक विचार व सूचना मांडल्या.
समारोपीय कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD अनिरुद्ध पालकर, सुमित मित्रा, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी आणि शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडल्या विकासाच्या संकल्पना
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ओम साई माईन्सचे अध्यक्ष सतीश मोहंती, अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेचे प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’चे डॉ. सतीश गोगुलवार, प्रोव्हीया ग्रुप बंगळुरूचे विकास जैन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या प्रियांका इडपात्रे, मत्स्य विभागाचे सहआयुक्त समीर डोंगरे, जिल्हा कृषी विभागाचे आनंद कांबळे, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे प्रवीण काळबांधे, नेहरू युवा केंद्राचे माजी संचालक मनोहर हेपट, दैनिक आदिवासी माणूसचे संपादक सुरेश पद्मशाली आणि जिल्हा उद्योग केंद्राचे धुळा कुळाल यांनीही जिल्ह्याच्या विकासासंदर्भात मार्गदर्शन केले.
या मान्यवरांनी उद्योग, रोजगार, आरोग्य, कृषी, मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, पर्यटन, नैसर्गिक साधनसंपत्ती, स्थानिक उद्योग आणि पायाभूत सुविधा यांसह जिल्ह्यातील विविध समस्या व विकासाच्या संधींबाबत आपली मते मांडली. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, आरोग्य सुविधा मजबूत करणे, मत्स्य व कृषी क्षेत्राचा विस्तार करणे तसेच आदिवासी व ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत विविध वक्त्यांनी व्यक्त केले.
माजी आमदार डॉ. देवराव होळी : ‘व्हिजन २०४७ हा जनतेच्या सहभागातून साकारला पाहिजे’
कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी समारोपीय मार्गदर्शन करताना गडचिरोलीच्या विकासासाठी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याला केवळ आकांक्षित जिल्हा म्हणून न पाहता २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर, रोजगारक्षम, आधुनिक आणि सर्वसमावेशक जिल्हा म्हणून उभे करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता आहे. या विकासामध्ये आदिवासी, शेतकरी, महिला, युवक, कामगार, उद्योजक आणि ग्रामीण नागरिकांच्या अपेक्षा केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती, जंगल, जमीन आणि जलसंपदा यांचे संवर्धन करताना रोजगार आणि उद्योगविकासाला चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दोन दिवसीय कार्यशाळेत मांडण्यात आलेल्या सूचना व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मतांचा विचार करून विकसित गडचिरोली व्हिजन २०४७चा व्यापक आराखडा तयार करण्यासाठी पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांचा सत्कार
कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवरांचे माजी आमदार डॉ. देवराव होळी व त्यांच्या टीम ने शाल, पुष्पगुच्छ व डायरी देऊन स्वागत व सत्कार केला. कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांचे परिश्रम
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, जिल्हा महासचिव अश्विनी आत्राम व त्यांच्या संपूर्ण पदाधिकारी, तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोलीच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, तालुका अध्यक्ष लिना कोकोडे, जिल्हा सहसचिव रेखा तोडासे, तनुजा कुमरे, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, सचिव रोहिणी मसराम, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, शहर अध्यक्ष निलेश आत्राम, सचिव श्याम सलामे व त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय राकेश भैसारे, सुनील सोरते, अनिल प्रिसीगलवार, दिलीप नैताम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.कार्यशाळेचे संचालन विजय शेंडे व उमेश उईके यांनी केले.
‘विकसित गडचिरोली’साठी नव्या दिशेचा संकल्प
दोन दिवसांच्या या कार्यशाळेत जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन विकासाच्या अनेक नवीन संकल्पना आणि सूचना पुढे आल्या. आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योग, कृषी, सिंचन, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि आदिवासी विकास या क्षेत्रांना गती देण्यासोबतच स्थानिक नागरिकांचे हक्क व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यावरही भर देण्यात आला.
विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, तज्ज्ञ आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गडचिरोलीच्या भविष्यासाठी विचारमंथन केल्याने ही कार्यशाळा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.
‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली’ या संकल्पनेतून २०४७ पर्यंत गडचिरोलीचा विकास साधण्यासाठी जनतेच्या सहभागातून तयार होणारा हा व्हिजन जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

