
उद्योग, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती, जंगल, मत्स्यव्यवसाय, आरोग्य व पर्यटनाच्या विकासावर मान्यवरांचे विचार
गडचिरोली : आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा २०४७ पर्यंत सर्वांगीण, शाश्वत व सर्वसमावेशक विकास कसा साधता येईल, यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व जिल्ह्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मान्यवरांनी पहिल्या दिवशी विविध विषयांवर सखोल विचारमंथन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. अनिल धामोडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच भविष्यात येऊ घातलेल्या उद्योग-कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण व शिक्षण प्रणाली याबाबत मार्गदर्शन केले. उद्योगांच्या वाढत्या संधींचा स्थानिक युवकांना फायदा मिळण्यासाठी शिक्षण व कौशल्यविकासाची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

एससी/एसटी विकास परिषदेच्या प्रदेश महिला सचिव ॲड. कविता माहोरकर यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांना शिक्षण, रोजगार, उद्योजकता, आर्थिक स्वावलंबन व निर्णय प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी करून घेतल्याशिवाय जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंदा गोपावर यांनी जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडून सुपीक जमिनीच्या भूसंपादनासंदर्भातील प्रश्नावर आपली भूमिका मांडली. विकासाच्या नावाखाली स्थानिक शेतकरी, जमीनमालक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, यासाठी विकासाचा समतोल दृष्टिकोन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कन्हानच्या नगरसेविका योगिता भलावी यांनी शाश्वत शेती आणि जंगल या विषयावर विचार मांडले. शेती, जंगल आणि स्थानिक जीवनपद्धती यांचा समतोल राखत नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे ही भविष्यातील विकासाची महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आलोक कांबळे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासावर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जलस्रोतांचा योग्य पद्धतीने वापर करून मत्स्य व्यवसायाला चालना दिल्यास स्थानिक नागरिक, युवक व महिलांसाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पौर्णिमा ईस्टाम यांनी जिल्ह्यातील वनसंपत्ती तसेच ग्रामीण भागातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेवर भाष्य केले. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुविधा, मनुष्यबळ आणि आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पंकज नंदगिरीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासावर मार्गदर्शन केले. जिल्ह्याला लाभलेली नैसर्गिक सौंदर्यस्थळे, जंगल, जलसंपदा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यांचा नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या माध्यमातून विकास केल्यास रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाग्यवान खोब्रागडे, चंद्रशेखर भडांगे, प्रकाश अर्जुनवार, प्रकाश ताकसांडे, गुरुदेव भोपये आणि विजयानंद रोडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध मूलभूत समस्या, स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत आपली मते मांडली.
कार्यशाळेत मांडण्यात आलेल्या सर्व विचारांमध्ये स्थानिक नागरिकांचे हित, रोजगारनिर्मिती, शिक्षणाचा दर्जा, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, शेतकऱ्यांचे संरक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, पर्यटन विकास आणि स्थानिक युवकांना उद्योग व रोजगाराच्या संधी यांना विशेष महत्त्व देण्यात आले.
या सर्व मान्यवरांचे कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शाल, पुष्पगुच्छ व डायरी देऊन स्वागत व सत्कार केला. जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा हा केवळ शासनाच्या योजनांवर आधारित न राहता गडचिरोलीतील नागरिक, तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, महिला, युवक आणि विविध क्षेत्रातील जाणकार यांच्या सूचना व अपेक्षांवर आधारित असावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या दोन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून गडचिरोलीच्या वर्तमान समस्यांचे विश्लेषण करून २०४७ पर्यंतचा विकसित, आत्मनिर्भर, रोजगारक्षम, शिक्षण व आरोग्याच्या बाबतीत सक्षम आणि पर्यावरणपूरक गडचिरोली घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर व्यापक चर्चा होत आहे.
कार्यशाळेचे संचालन विजय शेंडे यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या चर्चेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, दुसऱ्या दिवशीही जिल्ह्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर महत्त्वपूर्ण मंथन होणार आहे.
‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ हा केवळ विकासाचा दस्तऐवज न राहता जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या अपेक्षा आणि आकांक्षांना दिशा देणारा कृतीआराखडा ठरावा, अशी भावना कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.

