
नागपूर | प्रतिनिधी
आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेने आपले पत्ते उघडत ओबीसी चळवळीतील अतुल देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करत शिक्षक, पदवीधर आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
यापूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत शिक्षक भारतीने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने यावेळी संघटनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून अतुल देशमुख यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

अतुल देशमुख हे ओबीसी चळवळीतील सक्रिय आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षणाचे वाढते खासगीकरण रोखणे, सर्वसामान्यांना मोफत व दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे, शिक्षकांना सन्मानजनक वेतन, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पत्रकार परिषदेला माजी आमदार कपिल पाटील, राजेंद्र झाडे, नवनाथ गेंड, नितीन चौधरी, प्रा. सपन नेहरोत्रा, विठ्ठल जुनघरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी पदवीधर निवडणुकीत शिक्षक भारतीने अतुल देशमुख यांच्या रूपाने सक्षम उमेदवार मैदानात उतरवल्याने या निवडणुकीची उत्सुकता अधिक वाढली असून शिक्षक व पदवीधर मतदारांमध्ये या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

