
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी वानखेडे यांना एनएसयूआयचे निवेदन
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय अथवा विशेष तपास पथक (SIT) मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन एनएसयूआय गडचिरोली जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी वानखेडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समोर आलेल्या कथित अनियमिततेमुळे राज्यभरातील हजारो स्पर्धा परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही एनएसयूआयच्या वतीने करण्यात आली.

