
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची, दि. ३० जुलै :
तालुक्यातील पडियालजोब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ रस्ता व पुलाच्या गंभीर समस्येमुळे संतप्त झाले असून, या प्रश्नावरून त्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाल्यावरील पुलाच्या दुरवस्थेमुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे आणि शिक्षण घेणे मोठे आव्हान बनले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पडियालजोब गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूंनी माती खचल्याने पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, लहान मुलांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे, तर अनेकदा त्यांना शाळा चुकवावी लागत आहे. “आम्हाला नियमित शिक्षण मिळावे, शाळेत जाण्याचा मार्ग सुरक्षित व्हावा आणि आमचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा,” अशी भावनिक मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी सांगितले की, रस्त्याची ही समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कायम असून, याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार कळवूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या खराब रस्त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा मिळवणेही कठीण झाले आहे.
“शाळेतील मुलांचे भविष्य टांगणीला लागले आहे. पावसाळ्यात मार्ग बंद झाल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून किमान तात्पुरती दुरुस्ती करून मार्ग सुरळीत करावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ३० जुलै रोजी कोरचीच्या तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लवकरात लवकर रस्ता व पुलाची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आता या गंभीर प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

