
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
गेल्या चार दशकांपासून नक्षलवादाच्या छायेत जगणाऱ्या कोरची तालुक्यात अखेर शांततेची नवी पहाट उगवली आहे. यंदा प्रथमच नक्षलवाद्यांच्या तथाकथित ‘शहिद सप्ताहा’दरम्यान तालुक्यात कुठेही भीतीचे वातावरण न दिसता सर्व बाजारपेठा आणि शेतीची कामे सुरळीत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गडचिरोली पोलीस विभागाने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी मोहिमांमुळे उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक निलोफर यांनी “उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त करण्याचा” निर्धार जाहीर केल्यानंतर पोलीस यंत्रणेने राबविलेल्या धडाकेबाज कारवाईचा सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे.

पूर्वी कोरची दलम, टिपागड दलम आणि खोब्रामेढा दलम असे तीन प्रमुख नक्षल दलम या भागात सक्रिय होते. त्यांच्या कारवायांमुळे जाळपोळ, खून आणि दहशतीचे वातावरण कायम होते. विशेषतः दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल संघटनेचे संस्थापक चारु मुजूमदार यांच्या नावाने ‘शहिद सप्ताह’ साजरा केला जात असल्याने या आठवड्यात नागरिक भयभीत राहायचे.
मात्र, यंदा परिस्थिती पूर्णतः बदललेली दिसून येत आहे. शहिद सप्ताह सुरू असूनही गावागावांत कोणतीही भीती नसून बाजारपेठा गजबजलेल्या आहेत आणि शेतकरी निर्धास्तपणे शेतीची कामे करत आहेत. अनेक वर्षांनंतर नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला असून “नक्षलवाद” हा शब्दच आता लोक विसरत चालल्याचे चित्र आहे.
पोलीस विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे निर्माण झालेल्या या भयमुक्त वातावरणाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, कोरची तालुका आता विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत.

