
गडचिरोली| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली: ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आज (रविवार, २८ जून) गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ८२ हजार ९८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने २,३०८ लसीकरण केंद्रे, १२३ ट्रान्झिट पथके आणि ९८ मोबाईल पथके तैनात केली आहेत. बसस्थानके, तपासणी नाके, दुर्गम पाडे, वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचून प्रत्येक पात्र बालकाला पोलिओचा डोस मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “पोलिओसारख्या गंभीर आजारापासून कायमस्वरूपी संरक्षणासाठी प्रत्येक पात्र बालकाला पोलिओचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी या लोकहिताच्या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी, “पोलिओमुक्त भारत हे राष्ट्रीय ध्येय असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे,” असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनीही दुर्गम भागातील प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे सांगत पालकांनी कोणतीही शंका न बाळगता आपल्या बालकाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन केले.
पालकांना आवाहन
आरोग्य विभागाने सर्व पालकांना आजच आपल्या परिसरातील जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन केले आहे. पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

