
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.४ मे:
गडचिरोली शहरात आज एका दुर्मिळ निसर्गचमत्काराची चर्चा रंगली आहे. शहरातील गोकुल नगर भागात राहणारे भाऊराव जानबा रामटेके यांच्या निवासस्थानी आज, सोमवार दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी एक दुर्मिळ प्रजातीचा पांढरा उंदीर आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे सकाळची कामे सुरू असताना रामटेके कुटुंबाला घराच्या एका कोपऱ्यात काहीतरी वेगळे हालचाल करताना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता, चक्क पांढऱ्या शुभ्र रंगाचा उंदीर तिथे वावरत असल्याचे दिसून आले. सर्वसाधारणपणे काळ्या किंवा करड्या रंगाचे उंदीर पाहायला मिळतात, मात्र पूर्णपणे पांढरा उंदीर पाहून घरातील सदस्य थक्क झाले.

उत्सुकतेचा विषय ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच, हा दुर्मिळ उंदीर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रामटेके यांच्या घराकडे धाव घेतली. पांढरा शुभ्र रंग आणि लालसर डोळे असलेले हे उंदीर निसर्गात क्वचितच पाहायला मिळतात.
“सकाळी अचानक हा पांढरा उंदीर घरात दिसला. दिसायला तो अतिशय वेगळा आणि स्वच्छ पांढरा असल्याने आम्हीही चकित झालो. गडचिरोलीसारख्या भागात अशा दुर्मिळ जीवाचे दर्शन होणे ही आश्चर्याची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया भाऊराव रामटेके यांनी व्यक्त केली.
पांढरा उंदीर आणि शास्त्र काय सांगते?
प्राणीशास्त्रज्ञांच्या मते, अशा प्रकारचे पांढरे उंदीर हे ‘अल्बिनो’ (Albino) श्रेणीत मोडतात. जनुकीय बदलांमुळे त्यांच्या शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याची कमतरता असते, ज्यामुळे त्यांचा रंग पांढरा होतो. हे उंदीर दुर्मिळ मानले जातात कारण निसर्गात त्यांच्या रंगा मुळे ते भक्षकांपासून स्वतःचा बचाव सहज करू शकत नाहीत.
सध्या हा उंदीर सुरक्षित असून, त्याबाबत प्राणीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांनी कुतूहल व्यक्त केले आहे.

