
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.३ मे:
शहरातील प्रभाग क्रमांक १४ तेलंग मोहला मध्ये घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, शुक्रवारला रात्री एका घरातील गॅस हंडा (सिलिंडर) चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरीची ही सर्व दृश्ये नगर पंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
मध्यरात्री साधली संधी:वार्ड नं. १४ मधील रहिवासी मयूर आनंदवार यांच्या घरी शुक्रवारला रात्री ११ वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून गॅस हंडा पळवला. सिलिंडरसारखी जड वस्तू चोरून नेताना चोरट्याला कुणाचीही भीती उरली नसल्याचे यावरून दिसून येते.

नगर पंचायतीच्या कॅमेऱ्यात चोरटा कैद
चोरीचा शोध घेत असताना चामोर्शी नगर पंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. यामध्ये संबंधित चोरटा गॅस हंडा घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या फुटेजमुळे चोरट्याची ओळख पटवणे आता पोलिसांना सोपे होणार आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ऐन उन्हाळ्यात आणि गजबजलेल्या प्रभागात रात्री ११ वाजता चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “जर चोरटे सीसीटीव्ही असलेल्या भागातही इतक्या सहजासहजी चोरी करत असतील, तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

