
प्रतिनिधी / ३० नोव्हेंबर
काटोल – तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, तांदुळवाणी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तसेच मुर्ती केंद्र केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेले योगेश कमल हिराचंद्र चरडे यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीच्या आधारे विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्राप्त करून तालुक्याचा शैक्षणिक मान अधिक उंचावला आहे. सरदार पटेल विश्वविद्यालय, बालाघाट (म.प्र.) येथील दीक्षांत समारंभात मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष नरेंद्रसिंग तोमर, खासदार भारती पारधी, खासदार फगनसिंग कुलस्ते आणि कुलगुरू इंजि. दिवाकर सिंग यांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. newsjagar
योगेश चरडे यांनी “उच्चतर माध्यमिक विद्यालयांमध्ये एकल शिक्षण तसेच सह-शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या विविध आयामांचा अभ्यास — नागपूर जिल्ह्याच्या संदर्भात.” या महत्वाच्या विषयावर सखोल संशोधन केले. हे कार्य सरदार पटेल विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागप्रमुख डॉ.सी.पी. कुशवाह, प्राचार्य डॉ. बेला जोसेफ आणि प्राचार्य डॉ. मुकुंदलाल पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
शाळेतील आणि केंद्रातील दैनंदिन जबाबदाऱ्या, विविध शैक्षणिक उपक्रम राबवूनही योगेश चरडे Yogesh Charade यांनी आपल्या ध्येयापासून एकही पाऊल मागे घेतले नाही. जिद्द, सातत्य आणि इच्छाशक्ती असेल तर शिक्षणाचा प्रवास कधीही थांबत नाही, याचे जिवंत उदाहरण त्यांनी कृतीतून दाखवून दिले.ते मागील दोन दशकांपासून काटोल तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर आहेत. नवनवीन शैक्षणिक प्रयोग राबवून तसेच विविध प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून सातत्याने मार्गदर्शन करतात.
विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात.संशोधन क्षेत्रातील त्यांची ही कामगिरी तरुण शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून भविष्यात अधिक शिक्षक शैक्षणिक संशोधन क्षेत्रात आगेकूच करतील, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

