
श्री. नंदकिशोर वैरागडे विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची व देवरी तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी साकोली आगाराची कोरची–देवरी–साकोली–भंडारा–नागपूर ही बस सेवा पावसाळ्यातही नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष क्रांती केरामी यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, भंडारा विभागीय नियंत्रक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या मार्गावर दररोज सुमारे 80 ते 100 प्रवासी प्रवास करतात. सध्या ही बस सेवा सुरू असली तरी पावसाळ्यात ती बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास दुर्गम व आदिवासी भागातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटण्याची भीती आहे.

म्हणूनच साकोली आगार व्यवस्थापनाने पावसाळ्यातही बस सेवा बंद न करता सुरू ठेवावी, तसेच चांगल्या स्थितीतील बस उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या मार्गावरील प्रवासी संख्या व उत्पन्न लक्षात घेता ही सेवा अत्यावश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, बस सेवा बंद झाल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला असून प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

