
श्री. नंदकिशोर वैरागडे विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरात देशी-विदेशी दारूचा मुक्तपणे वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जंगल परिसरात टाकण्यात आलेल्या शेकडो रिकाम्या दारूच्या बाटल्या याचे जिवंत उदाहरण ठरत आहेत.
सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळल्याने, या भागात नियमितपणे दारू सेवन व अवैध विक्री सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, दारूबंदी लागू असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारे खुलेआम दारू उपलब्ध होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून,
“पोलिसांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष किंवा संगनमत असल्याशिवाय एवढ्या प्रमाणात दारू येऊ शकत नाही,”
असा आरोप करण्यात येत आहे.
दारूबंदी फक्त कागदावरच?
गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदी लागू आहे. ग्रामसभांनीही कठोर ठराव करून दारूबंदीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्यक्षात कोटगुलसारख्या भागात परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे.
नागरिकांची ठोस मागणी
अवैध दारू विक्रीची तात्काळ चौकशी करावी
पुरवठा साखळी उघड करून दोषींवर कारवाई करावी, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातच अशा घटना घडत असल्याने शासनाच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कोटगुलमधील ही घटना प्रशासनासाठी एक इशारा असून, तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

