
विवाहयोग्य युवक-युवतींसह पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : विवाहयोग्य वधू-वरांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच समाजातील कुटुंबांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने चामोर्शी येथे रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य तेली समाज वधू-वर व पालक परिचय नोंदणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विवाहयोग्य युवक-युवतींना परस्पर परिचयाची संधी मिळणार असून, पालकांनाही विवाहासाठी योग्य स्थळांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

हा मेळावा सकाळी ११.३० वाजता चामोर्शी येथील इम्पेरियल सेलिब्रेशन हॉल, मूल रोड येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे उपाध्यक्ष बाबुराव कोहळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा योगिता भांडेकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष व सावतेली समाजाचे सदस्य गजानन भांडेकर राहणार आहेत.
याशिवाय महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष प्रमोद पिपरे, सावतेली समाजाचे सदस्य रमेश बारसागडे, प्रभाकर वासेकर, दादाजी बारसागडे, नानाजी बुरांडे, संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष भैय्या सोमणकर यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वधू-वरांसाठी महत्त्वाची संधी!
या परिचय मेळाव्यात शासकीय व निमशासकीय कर्मचारी, खासगी क्षेत्रात कार्यरत युवक-युवती, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी तसेच विविध क्षेत्रांतील शिक्षित व उच्चशिक्षित विवाहयोग्य युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. इच्छुक वधू-वरांना आपला परिचय नोंदविण्याची आणि पालकांना योग्य स्थळांची माहिती मिळविण्याची संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात विवाहासाठी योग्य स्थळ शोधताना पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन समाजातील विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी हाती घेतला आहे.
सामाजिक एकोप्यासाठी पुढाकार
या मेळाव्याचे आयोजन श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद सातपुते, त्यांचे सहकारी, समाजातील कार्यकर्ते आणि नवयुवक संयोजक मंडळ मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
“समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि योग्य जीवनसाथी निवडण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिचय नोंदणी करावी,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

