
चंद्रपूर काँग्रेसची ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानासाठी हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे बैठक ; १ नोव्हेंबरच्या दिल्ली महारॅलीत मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन..
न्यूज जागर | चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी..

चंद्रपूर : लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील हॉटेल सिद्धार्थ प्रिमियर येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) चंद्रपूर जिल्हा निरीक्षक तथा मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री आमदार बाला बच्चन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

🔴१ नोव्हेंबरच्या दिल्ली महारॅलीसाठी तयारी
बैठकीत ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. येत्या १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित महारॅलीत चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आमदार बाला बच्चन यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. मतदारांच्या अधिकारांविषयी जनजागृती करणे, लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ करणे आणि काँग्रेसची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले.
🔴पत्रकार परिषदेत ‘मत चोरी’चा मुद्दा उपस्थित
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बाला बच्चन, आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान, मतदारांच्या हक्कांचा मुद्दा आणि दिल्लीतील आगामी महारॅलीविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी काँग्रेस नेत्यांनी ‘मत चोरी’चा मुद्दा उपस्थित करत याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. भारतीय लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडी संघर्ष करत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या महारॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘मत चोरी’संदर्भातील हे दावे काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
🔴काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा राव पोलशेट्टी यांनी केले. जिल्हा शहर अध्यक्ष मनीष तिवारी यांनी सूत्रसंचालन केले, तर शहर महिला जिल्हाध्यक्षा चंदाताई वैरागडे यांनी आभार मानले.
या बैठकीला अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष सफाक शेख, प्रदेश सचिव रोशनलाल बिट्टू, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, के. के. सिंग, प्रवीण पडवेकर, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. राम राऊत, प्रमोद बोरीकर, दीपक वाढई, श्यामकांत थेरे, सपना मोरे, पवन भगत आणि सुनीता गोवर्धन उपस्थित होते.
याशिवाय नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा अल्काताई वाढई, माजी महापौर संगीता अमृतकर, महानगरपालिकेचे काँग्रेस गटनेते सुरेंद्र अडबाले, नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी, दिनेश चोखारे, प्रवीण काकडे, भास्कर माकोडे, विजय घरत, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, उत्तमराव पेचे, रंजन लांडे, गोविंदा उपरे, अशोक रेचनकर, नितीन गोहणे, वासुदेव पाल, रमाकांत लोधे, राजेंद्र चिकटे आणि शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख यांच्यासह जिल्हा, शहर व तालुका स्तरावरील पदाधिकारी, विविध आघाडी संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
✒️बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.. चेतन म. कामडे.. न्यूज जागर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.. 📱संपर्क मो. ९३०७५५३०१४..
🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧

