
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी

अहेरी : किष्टापूर फाटा ते खमनचेरु टर्निंग पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि पुलाची खराब झालेली अवस्था यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण करावे, तसेच संबंधित पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, अहेरी येथील उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मार्गावरून दररोज नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. तसेच पुलाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर युवासेना,अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन येरोजवार यांच्या मार्गदर्शना खाली आणि शिवसेना अहेरी शहर संघटक #आयुष सुनील मामीडवार यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संबंधित मार्गाची पाहणी करावी आणि रस्ता दुरुस्ती, डांबरीकरण तसेच पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अहेरी शहर प्रमुख विनेश तोटावार,अमित संगूवार श्रीनिवास सिडाम, करण सिडाम आदी उपस्थित होते.संबंधित विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली.

