
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा आवाज बुलंद; विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अशोक पोरेड्डीवार यांची प्रमुख उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (घोट), दि. २८ सप्टेंबर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच नागपूर करारातील अटींची पूर्तता झाली नसल्याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी (दि. २८) घोट येथील बसस्टॉप चौकात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी नागपूर कराराची होळी करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यात आला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने २८ सप्टेंबर रोजी विदर्भातील ११ जिल्ह्यांतील १२० तालुक्यांमध्ये ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार घोट येथेही हे आंदोलन पार पडले.
समितीच्या म्हणण्यानुसार, २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारातील अपेक्षित अटींची अद्याप पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर कराराची होळी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देत आपली भूमिका स्पष्ट केली. विदर्भातील जनतेच्या प्रश्नांना स्वतंत्र राज्याच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अशोक पोरेड्डीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अविनाश वडेट्टीवार, मोतीराम लाटेलवार, कांबळे सर, आसिफ सय्यद, हेमंत उपाध्ये, रामदास कामेलवार, बंडू जुवारे, उमेश सरकार, अमित शहा, बाळू शहा यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपूर कराराची होळी करून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

