
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकरी अनियमित पाऊस, अपुरा पाणीपुरवठा आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने धान, सोयाबीन व कापूस या पिकांवर अवलंबून आहेत. यंदा मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे पिकांना मोठा फटका बसला असून, अपुरा पाऊस आणि पावसातील खंडामुळे अनेक भागांत शेतीची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच रानटी हत्तींचा वाढता उपद्रव आणि अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

काही भागांत धान पिकाला पुरेशा पाण्याअभावी फटका बसत आहे. सौर कृषी पंप केवळ दिवसा सुरू असतात; मात्र पिकांना पाण्याची गरज अनेकदा रात्रीही भासते. वीजपुरवठा अनियमित असल्याने सिंचनात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
२४ तास अखंडित वीजपुरवठ्याची मागणी
शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी कृषी पंपांना २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही डॉ. किरसान यांनी केली आहे. जिल्ह्यातील सध्याची कृषी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
थकीत बोनस तत्काळ द्यावा
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली थकीत बोनसची रक्कमही तातडीने वितरित करावी, अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोली जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, थकीत बोनसचे वितरण आणि सुरळीत वीजपुरवठा या मागण्यांकडे आता शासन काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

