
सुधारित तारीख व वेळ स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार
गडचिरोली, दि. २४ सप्टेंबर : निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे (प्लेसमेंट ड्राईव्ह) तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांची सुधारित तारीख व वेळ स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रा. ना. माटे यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर, औरंगाबाद व पुणे पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गडचिरोली जिल्ह्याचा नागपूर पदवीधर मतदारसंघात समावेश असल्याने जिल्ह्यात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने दि. २९ सप्टेंबर रोजी नियोजित रोजगार मेळावे स्थगित करण्यात आले आहेत.

स्थगित करण्यात आलेल्या मेळाव्यांमध्ये शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली; महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालय, आरमोरी; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा; शहीद बिरसा मुंडा महाविद्यालय, कोरची; शिवाजी ज्युनिअर कॉलेज, चामोर्शी; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली; भगवंतराव आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, एटापल्ली आणि श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, धानोरा येथील नियोजित रोजगार मेळाव्यांचा समावेश आहे.
या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी तसेच कंपन्या, उद्योजक व आस्थापनांनी या बदलाची नोंद घ्यावी. मेळाव्यांच्या पुढील आयोजनाची तारीख, वेळ व अन्य आवश्यक माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.

