
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
वार्ड क्रमांक १६ मधील प्रकाराने पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; मागील वर्षी वार्ड ४ मध्येही अशीच घटना
कोरची : नगरपंचायतीच्या नळातून नागरिकांना पाणीपुरवठा होत असताना त्या पाण्यात चक्क एक मीटरपेक्षा अधिक लांबीचा नाळू आढळून आल्याने कोरचीत खळबळ उडाली आहे. वार्ड क्रमांक १६ मध्ये नारायण मोहुर्ले यांच्या घराजवळील नगरपंचायतीच्या नळातून हा नाळू बाहेर पडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, मागील वर्षी वार्ड क्रमांक ४ मध्येही नगरपंचायतीच्या नळातून अशाच प्रकारे नाळू निघाल्याची घटना घडली होती. त्यामुळे वारंवार अशा घटना घडूनही पाणीपुरवठा यंत्रणेची योग्य देखभाल व तपासणी केली जाते का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायतीकडून नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी त्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. मात्र नळातून नाळू, गाळ किंवा इतर घाण आढळत असेल तर पाणीपुरवठा व्यवस्थेच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतो. संबंधित जलवाहिन्यांची नियमित साफसफाई, तपासणी आणि दुरुस्ती केली जाते की केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, धानोरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांच्याकडे कोरची नगरपंचायतीचा अतिरिक्त प्रभार असल्याने दोन्ही अधिकारी कोरचीपासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा येथूनही कारभार पाहत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरची नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर त्यांचे प्रत्यक्ष किती नियंत्रण राहते, हा मुद्दाही चर्चेत आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी कोरची येथे नेमके किती दिवस उपस्थित राहतात, नागरिकांच्या तक्रारींची दखल कशी घेतली जाते आणि प्रत्यक्ष पाहणी किती वेळा केली जाते, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक पातळीवर काही नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, अधिकारी ठेकेदार व काही नगरसेवकांच्या कामांकडे अधिक लक्ष देतात, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप काही स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या आरोपांची प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आहे.
नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघण्याची घटना ही केवळ एक गंमत म्हणून न पाहता पाणीपुरवठा यंत्रणेच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची संधी म्हणून प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे. संबंधित जलवाहिनीची तातडीने पाहणी करून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत, जलवाहिन्यांची स्वच्छता व दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


