
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : शिर्डीचे साईबाबा यांनी मानवतेला ‘सबका मालिक एक’ तसेच ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा जीवनमूल्यांचा महामंत्र दिला. त्यांच्या शिकवणीतून संयम, विश्वास आणि सेवाभावाची प्रेरणा मिळते. याच आध्यात्मिक विचारांचा जागर करत श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री साई सच्चरित्र साखळी पारायणाचा समारोपीय सोहळा बुधवारी (२४ सप्टेंबर) येथील श्री साई मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडला.
श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या पुढाकारातून १० जुलै २०२५ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चंद्रपूर, गडचिरोली, चामोर्शी, भंडारा व मूल परिसरातील ५३ महिलांनी या साखळी पारायणात सहभाग घेतला. प्रत्येक गुरुवारी आपल्या निवासस्थानी श्री साई सच्चरित्रातील अध्यायांचे वाचन करून महिलांनी हा आध्यात्मिक उपक्रम अखंडपणे सुरू ठेवला.

या पारायणाच्या सांगता सोहळ्यानिमित्त श्री साई मंदिरात श्री साई सच्चरित्राचे सामूहिक वाचन, श्री साई पूजन, होमहवन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ५३ महिला भक्तांनी भक्तिभावाने सच्चरित्र वाचन करून साईबाबांच्या श्रद्धा, सबुरी, संयम आणि विश्वास या संदेशाचा जागर केला. संपूर्ण परिसरात साईनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पारायणाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांना अन्नदानाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे सहभागी महिलांमध्ये आध्यात्मिक एकात्मता निर्माण झाली असून, साईबाबांच्या विचारांचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला रवि बोमनवार, अमित यासलवार, मनोज बोमनवार, श्रीरंग नागोसे, बबन वडेट्टीवार, सुरज केलझरकर यांच्यासह साईभक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सच्चरित्र वाचनातून मनःशांतीचा अनुभव’
सुरेखा बोमनवार (संतोषवार), ग्रुप प्रमुख, चंद्रपूर म्हणाल्या, “साईबाबांनी जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा महामंत्र दिला. त्यांच्या सच्चरित्राचे वाचन करण्याची इच्छा होती. त्यासाठी ५३ महिलांना एकत्र करून साखळी पारायण सुरू केले. वर्षभर सातत्याने पारायण करताना मनाला मोठा आनंद आणि समाधान मिळाले. साई सच्चरित्राच्या वाचनातून मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव आला.”

