
बैल चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गणेश दास यांची वाघाशी झुंज; चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी : तालुक्यातील घोट परिसरालगत असलेल्या ठाकूरनगर येथील जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या ४८ वर्षीय इसमावर वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गणेश खितीश दास (रा. ठाकूरनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. वाघाशी झालेल्या झुंजीत त्यांनी प्रसंगावधान राखत आपला जीव वाचविल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर जखमी गणेश दास यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यामुळे दास कुटुंबीयांवर संकट कोसळले असून, वन विभागाने तातडीने नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जखमीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, ठाकूरनगर परिसरातील जंगलात तीन ते चार वाघांचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यापूर्वीही सुमारे महिनाभरापूर्वी याच परिसरात एका बच्छड्यावर वाघाने हल्ला केल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाच्या वाढत्या वावरामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने या परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

