
जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी; पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर चामोर्शी शहरातील युवा स्केटिंगपटू गार्गी अमोल आईंचवार हिने आपल्या क्रीडा कौशल्याची दमदार छाप उमटवत प्रादेशिक (Regional) स्तरावर झेप घेतली आहे. गडचिरोली जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत गार्गीने उल्लेखनीय कामगिरी करत पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

Carmel Academy येथील विद्यार्थिनी असलेली गार्गी शिक्षणासोबतच स्केटिंगचा नियमित सराव करत आहे. अभ्यास आणि क्रीडा यांचा सुरेख समतोल साधत तिने आपल्या खेळात सातत्याने प्रगती केली आहे. अल्पावधीतच तिने दाखविलेली कामगिरी तिच्या मेहनतीची आणि क्रीडा क्षेत्रातील जिद्दीची साक्ष देणारी ठरली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध खेळाडूंमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत गार्गीने प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली. तिच्या या यशामुळे चामोर्शीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पालक, शिक्षक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गार्गीच्या यशामागे तिचा नियमित सराव, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यासोबतच पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचे स्वप्न!
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना गार्गीने “मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर भविष्यात राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचे माझे स्वप्न आहे,” अशी महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.
चामोर्शीच्या या होतकरू स्केटिंगपटूने मिळविलेली प्रादेशिक स्तरावरील झेप ही तिच्या क्रीडा कारकिर्दीतील महत्त्वाची पायरी मानली जात आहे. योग्य संधी, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शन मिळाल्यास गार्गी भविष्यात गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नक्कीच योगदान देईल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
चामोर्शीच्या या ‘स्केटिंग गर्ल’च्या यशाने शहरातील नवोदित खेळाडूंनाही प्रेरणेची नवी दिशा मिळाली आहे.

