
जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी नागपूरला निवड
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी :शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत घेण्यात आलेल्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात शिवाजी विद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. अंजली रामेश्वर होडके हिने आपल्या उत्कृष्ट बुद्धिकौशल्याची चमक दाखवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिवाजी विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बुद्धिबळ हा बुद्धी, संयम, एकाग्रता आणि डावपेचांचा खेळ मानला जातो. या क्रीडा प्रकारात अंजलीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सातत्यपूर्ण आणि दमदार खेळाचे प्रदर्शन केले. प्रत्येक चाल अचूक अंदाजाने खेळत तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले.
अंजलीच्या या यशामुळे तिच्या पालकांसह शिवाजी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, यासाठी विद्यालयाकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच परिणाम म्हणून अंजलीने बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर अंजलीची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी नागपूर येथे निवड झाली आहे. त्यामुळे आता विभागीय स्पर्धेतही आपल्या खेळाची चमक दाखवत शिवाजी विद्यालयाच्या यशात आणखी भर घालण्याचे आव्हान तिच्यासमोर आहे.
अंजली होडबे हिच्या या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले असून, विभागीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करून विद्यालयाचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
“जिल्ह्यातील विजयानंतर आता नागपूरच्या विभागीय स्पर्धेत अंजलीसमोर नवे आव्हान; बुद्धिबळाच्या पटावर पुन्हा एकदा विजयाची चाल खेळण्यास ती सज्ज!”

