
दुष्काळसदृश परिस्थिती, रानटी हत्तींचा उपद्रव आणि एसटीच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बाधित भागांचे तातडीने सर्वेक्षण करून गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित भागांचा दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावेश करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी आ. डॉ. नरोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

रानटी हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभारावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने व पुरेशी भरपाई द्यावी तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एसटी बससेवा सक्षम करण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एसटी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नाकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्यात एसटी बसेसची अपुरी संख्या तसेच चालक व वाहकांची रिक्त पदे यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, आवश्यकतेनुसार अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही आ. डॉ. नरोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली.

