
ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळणे गरजेचे; क्रीडा स्पर्धांमधून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात –माजी आ. डॉ. देवराव होळी
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (वैरागड) : वैरागड येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. उद्घाटनानिमित्त परिसरातील क्रीडाप्रेमी, युवक आणि कबड्डीपटूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी डॉ. देवराव होळी यांनी मैदानावर उपस्थित खेळाडूंशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठी क्रीडा गुणवत्ता असून, अशा स्पर्धांच्या माध्यमातून या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळते. क्रीडा क्षेत्रामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्पर्धा मंडळाच्या वतीने भोलू सोमनानी व शीतल सोमनानी यांच्या हस्ते डॉ. देवराव होळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध संघांमधील चुरशीच्या लढतींमुळे मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले. आपल्या संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी आयोजक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच कबड्डीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैरागडमध्ये रंगलेल्या या कबड्डी स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाभावना आणि उत्साहाला नवी ऊर्जा मिळाली आहे.

