
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : येथील केवळराम हरडे वाणिज्य महाविद्यालयात रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तालुका शाखा चामोर्शी यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन lकरण्यात आले. ग्राहकांचे हक्क, व्यापारी व ग्राहक यांच्यातील संबंध तसेच ग्राहकांच्या विविध समस्या यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शाम रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक हरीश गांधी, विलास ठोंबरे, बबन वडेट्टीवार, महेश जोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी प्राचार्य शाम रामटेके यांनी ग्राहकांनी वस्तू अथवा सेवा खरेदी करताना आवश्यक ती काळजी घेणे, खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल घेणे, वस्तूंची गुणवत्ता व किंमत तपासणे तसेच ग्राहक म्हणून असलेल्या अधिकारांविषयी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
त्याचबरोबर व्यापाऱ्यांनीही ग्राहकांशी पारदर्शक व प्रामाणिक व्यवहार करून ग्राहकांचा विश्वास कायम राखण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
बैठकीत ग्राहकांच्या तक्रारी, व्यापारी-ग्राहक यांच्यातील समन्वय, ग्राहक जनजागृती आणि ग्राहक पंचायतच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली. ग्राहकांचे प्रश्न केवळ तक्रारींपुरते मर्यादित न राहता त्यांना योग्य मार्गदर्शन व न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा सूर बैठकीत उमटला.
यावेळी उपस्थित मान्यवर व ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी-सदस्यांनी ग्राहक संरक्षणाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध विषयांवर आपली मते मांडली.
बैठकीस न.प.उपाध्यक्ष लोमेश बुरांडे,संजना सोमणकर, नितेश गट्टीवार,रियाज शेख, श्रावण वाकोडे, प्रकाश घोगरे,प्रा.टेपलवार , अमित साखरे, गजानन बारसागडे,घनश्याम मनबत्तुलवार ,गंगाधरराव पाल,सुनील तूरे प्रा. चौथाले, व्यापारी, ग्राहक तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे यांनी केले.संचालन चंद्रकांत कुनघाडकर तर आभार अरूण गव्हारे यांनी मानले

