
“जमीन अधिग्रहण न करता शेतकऱ्यांना न्याय द्या” – महेंद्र ब्राह्मणवाडे
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी, दि. ३० ऑगस्ट : हिरापूर,राखी ,गुरवळा प्रस्तावित विमानतळ व जयरामपूर -मुधोली परिसरातील १३ गावांचा तसेच भेंडाळा परिसरातील १४ गावांमधील जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आता ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडेश्वराच्या चरणी साकडे घालण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी मार्कंडादेव येथे महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आज दि.३० ॶॉगस्ट रोजी मार्कंडा देव जगन्नाथ बाबा मंदिर येथे शेतकऱ्यांची नियोजन बैठक व पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्यांच्याशी चर्चा करावी आणि जमीन अधिग्रहण न करता न्यायाचा मार्ग काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“गडचिरोली जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही मार्कंडेश्वराच्या चरणी साकडे घालणार आहोत. मात्र, सरकार अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी साधी चर्चाही होत नाही,” असा संताप शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे आणि त्यांच्या जमिनी वाचाव्यात, यासाठी हा महाअभिषेक आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः या महाअभिषेकाला उपस्थित राहून शेतकऱ्यांची भूमिका ऐकावी, असे निमंत्रणही शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.
या महाअभिषेक कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक सुमेध तुरे, सोशल मीडिया प्रमुख विजय लाड, काँग्रेस चामोर्शी शहराध्यक्ष विलास चिचघरे, अमर मोगरे, संजय बुरांडे, लीलाधर सुरजागडे, दिवाकर निसार, गुरुदास ठुसे, नरेंद्र कोठारे, मुखरू शेंडे, वसंत बुरमवार, तात्याजी चिचघरे, नदीम नाथानी, सुनील कोहपरे, नेताजी गावतुरे, नुमचंद भिवणकर, अभिषेक रोहनकर, नीलकंठ हजारे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

