
‘फुटबॉल स्पर्धा २०२६’चा जल्लोषात शुभारंभ; माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या किकने रंगले मैदान
जिल्हा प्रतिनिधी|
गडचिरोली /चामोर्शी | दि. २९ ऑगस्ट :

गेल्या तब्बल ४७ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या गौरीपूरच्या फुटबॉल परंपरेला यंदाही उत्साहाचे उधाण आले आहे. जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘फुटबॉल स्पर्धा २०२६’चा दिमाखदार शुभारंभ शुक्रवारी जय दुर्गा स्टेडियम, चामोर्शी-घोट रोड, बसस्टँड, गौरीपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, डॉ. नेते यांनी स्वतः मैदानात उतरून फुटबॉलला किक मारत गोल करून स्पर्धेचा श्रीगणेशा केला. त्यांच्या या अनोख्या सहभागामुळे मैदानावर उपस्थित खेळाडू, युवक व क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उद्घाटनानंतर डॉ. अशोक नेते यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ४७ वर्षांपासून क्रीडा क्षेत्राची परंपरा जपणाऱ्या जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
‘शिक्षणासोबत खेळालाही महत्त्व द्या’
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अशोक नेते म्हणाले की, “गौरीपूर येथे दरवर्षी होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेला माझी सातत्याने उपस्थिती राहिली आहे. गेल्या ४७ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू राहणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, आत्मविश्वास वाढतो आणि संघभावना विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व युवकांनी शिक्षणासोबतच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे.”
क्रीडा क्षेत्रातून शिस्त, नेतृत्वगुण, परस्पर सहकार्य आणि राष्ट्रभावना निर्माण होते. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता असून, अशा स्पर्धांमुळे त्यांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळते. युवकांनी खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता क्रीडेतून व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विजेत्यांसाठी रोख पारितोषिकांची मोठी घोषणा
यंदाच्या स्पर्धेसाठी आयोजकांकडून आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्याकडून ५५,००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून ३५,००१ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी डॉ. प्रणय खुणे यांच्याकडून १५,००१ रुपये देण्यात येणार आहेत.
याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तसेच विविध वैयक्तिक व सांघिक कामगिरीसाठी विशेष पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेकडे परिसरातील क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
उद्घाटन सोहळ्यास आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, भाजपा तालुका अध्यक्षा रोशनी वरघंटे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, भाजपा बंगाली मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई रॉय, युवा नेते भाविकजी आभारे, माजी पंचायत समिती सदस्य तथा तालुका महामंत्री विष्णु ढाली, ज्येष्ठ नेते मनोहर बामणकर, माजी सरपंच अशीम मुखर्जी, उपसरपंच महानंदजी हलदार यांच्यासह अनेक मान्यवर, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आयोजक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.
राष्ट्रगीताने झाली भावपूर्ण सांगता
४७ वर्षांची अखंड क्रीडा परंपरा जपत ग्रामीण भागातील युवकांना क्रीडाक्षेत्राची नवी दिशा देणाऱ्या जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्पर्धेमुळे गौरीपूर परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीताने संपूर्ण वातावरण भारावून गेले. राष्ट्रगीताच्या माध्यमातून खेळाडू व युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम, शिस्त आणि राष्ट्रभावना जागृत करण्याचा संदेश देत उद्घाटन सोहळ्याची भावपूर्ण सांगता करण्यात आली.

