
गणपूर (रे.) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुधोली चक नं. १ येथे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद २७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात पार पडली. केंद्रप्रमुख श्री. कपिल सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध शैक्षणिक उपक्रम व योजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण परिषदेच्या माध्यमातून ‘शिक्षण निपुण महाराष्ट्र’, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठाचे नमुना सादरीकरण करण्यात आले. यासोबतच शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या यशोगाथा व Best Practices सादर करून परस्पर अनुभवांची देवाणघेवाण केली.
शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यासाठी केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक संधींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा कार्यक्रमाचा आढावा, तसेच त्यासंदर्भातील अडचणी व समस्यांच्या निराकरणावर चर्चा करण्यात आली.

तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात शिक्षकांनी अद्ययावत राहण्याची गरज लक्षात घेऊन DIKSHA Courses आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यासंदर्भातील माहितीही परिषदेत देण्यात आली. त्याचबरोबर मूल्यवर्धन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, सत्रनिहाय अपेक्षित परिणाम, ‘नवभारत साक्षरता’ अभियान यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व एकाग्रतेलाही शिक्षण प्रक्रियेत महत्त्व देण्यात आले. आनापान ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याबाबत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शिक्षण हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाशी जोडण्याचा संदेश परिषदेतून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मुधोलीचे उपसरपंच श्री. दिलीप वर्धलवार होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक शेडमाके, नामदेव वर्धलवार, संजय शेडमाके, विशेष शिक्षक श्री. रवीभाऊ खेवले, तसेच गणपूर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
परिषदेदरम्यान शिक्षकांनी विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण करताना प्रत्यक्ष अनुभव मांडले. त्यामुळे शिक्षकांना नवीन उपक्रमांची प्रेरणा मिळण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी परस्पर सहकार्याची दिशा मिळाली. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील गुणवत्ता, कौशल्यविकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी अशा शिक्षण परिषदांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुधोली शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवराव वर्धलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संतोष नागरगोजे यांनी केले. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद यशस्वीपणे संपन्न झाली.

