
पुलाअभावी खाटेवरून नाल्याच्या मार्गाने करावा लागला प्रवास; एटापल्ली तालुक्यातील कोइदुळ गावातील संतापजनक वास्तव
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
एटापल्ली : रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस. मात्र, याच दिवशी एटापल्ली तालुक्यातील कोइदुळ गावातील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी अक्षरशः खाटेवरून वाहून नेण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोइदुळ गावातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. गावाजवळील नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय होते. २८ ऑगस्ट रोजी एका गर्भवती महिलेला नातेवाईकांनी खाटेची कावड करून पुरातून मार्गक्रमण करत बाहेर काढले.
रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे कठीण, रस्ता अपुरा आणि नाल्यावर पूल नाही—अशा परिस्थितीत गर्भवती महिलेला खाटेवरून नेण्याची वेळ येणे ही केवळ एका कुटुंबाची व्यथा नसून ग्रामीण भागातील आरोग्य व दळणवळण व्यवस्थेचे विदारक वास्तव आहे.
‘विकास’ कुठे आहे? नागरिकांचा सवाल
एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे दुर्गम गावांतील नागरिकांना साध्या रस्त्यासाठी आणि पुलासाठी झगडावे लागत आहे. गर्भवती महिलेला वेळेवर उपचार मिळण्यासाठी खाटेची कावड करावी लागत असेल, तर प्रशासनाने या गावांच्या समस्यांकडे आणखी किती दिवस दुर्लक्ष करायचे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातावर राखी बांधण्याऐवजी तिच्या सुरक्षित आरोग्यासाठी भाऊ-नातेवाईकांना खाटेची कावड करावी लागणे, ही व्यवस्था आणि प्रशासनासाठी गंभीर आत्मपरीक्षणाची बाब आहे.
कोइदुळ गावातील नाल्यावर तातडीने पूल उभारून बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

