
जिल्ह्यात सरासरी २५.२ मिमी पावसाची नोंद; गोसीखुर्दचे १९ दरवाजे उघडे, चिचडोह व मेडीगड्डा बॅरेजमधूनही मोठा विसर्ग
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २३ ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील ४५ पैकी सर्व ४५ पर्जन्यमापक केंद्रांवर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमानाची नोंद २५.२ मिमी झाली आहे. विशेषतः कोरची, मुलचेरा आणि कुरखेडा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला.

तालुकानिहाय नोंदीनुसार कोरची येथे ६३.५ मिमी, मुलचेरा ५४.३ मिमी, कुरखेडा ४१.३ मिमी, आर्मोरी १८.३ मिमी, चामोर्शी १९.० मिमी, अहेरी १९.६ मिमी आणि भामरागड १९.५ मिमी पावसाची नोंद झाली. गडचिरोलीत १०.२ मिमी, धानोरा २०.९ मिमी, देसाईगंज १३.५ मिमी, सिरोंचा ८.१ मिमी आणि एटापल्ली १४.१ मिमी पाऊस झाला.
कोरचीत सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद बेडगाव (ता. कोरची) येथे ७९.४ मिमी झाली. त्यानंतर मुलचेरा ७८.२ मिमी, कोरची ७१.६ मिमी आणि मसेली ६८.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४ हेवी रेनफॉल सर्कल नोंदविण्यात आले आहेत.
धरणांच्या विसर्गामुळे नदीकाठच्या भागात सतर्कता
दरम्यान, धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने विविध प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोसीखुर्द प्रकल्पाची पाणीपातळी ६८.६५ टक्के असून ३३ पैकी १९ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. येथून तब्बल २,३०७ क्युसेक्स अर्थात ८१,४८२ क्युसेक्स विसर्ग होत आहे.
चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे उघडे असून तेथून १,३२७ क्युमेक्स अर्थात ४६,८६२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर मेडीगड्डा बॅरेजचे सर्व ८५ दरवाजे उघडे असून तेथून १,५५२ क्युमेक्स अर्थात ५४,८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
दुसरीकडे निम्न वर्धा, श्रीराम सागर आणि श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पांचे सर्व दरवाजे बंद असून या प्रकल्पांतून सध्या विसर्ग शून्य आहे.
पावसाचा जोर आणि विविध प्रकल्पांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पाहता नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस काहीसा दिलासादायक ठरला असला तरी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे.

