
गडचिरोली,दि.२२ ॶॉगस्ट : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि सुरक्षिततेबाबत गंभीर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आदिवासी विकास विभागाने धडक कारवाई केली आहे.
आश्रमशाळेतील निकृष्ट जेवण, दूषित पाणी आणि ढासळलेल्या सुरक्षिततेची गंभीर दखल घेत आदिवासी विकास आयुक्तांनी तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि सहायक प्रकल्प अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्धीकरणाशिवाय बोअरवेलचे दूषित पाणी दिले जात असल्याचे तपासात उघडकीस आले. तसेच जेवणाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट असून ठरवून दिलेल्या मेन्यूचे पालन केले जात नव्हते. वसतिगृहातील स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांची अवस्था अत्यंत दयनीय होती, तर प्राथमिक उपचारासाठी औषधपेटीसुद्धा उपलब्ध नव्हती.

कारणे दाखवा नोटीस आणि खुलासा अमान्य
आश्रमशाळेतील या गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन. कन्राके आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी.पी. सादमवार यांनी सादर केलेले खुलासे वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याने प्रशासनाने फेटाळून लावले.
आदिवासी विकास आयुक्तांची कठोर कारवाई
विद्यार्थ्यांच्या आरोग्य, अन्न, स्वच्छता, निवास आणि सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या बाबींकडे वारंवार दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नागपूरचे आदिवासी विकास आयुक्त (आय.ए.एस.) यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७५ मधील अधिकारांचा वापर करत दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
या धडक कारवाईमुळे शिक्षण आणि आदिवासी आश्रमशाळा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील इतर आश्रमशाळांच्या व्यवस्थेवरही आता प्रशासनाचा वचक निर्माण झाला आहे.

