
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : ग्रामीण भागातील नागरिकांच्या शासकीय कामकाजाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या चामोर्शी पंचायत समितीच्या इमारतीची अवस्था दिवसेंदिवस जीर्ण होत चालली असून, प्रशासनाच्या देखभाल-दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज विविध कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक पंचायत समिती कार्यालयात येत असताना इमारतीची सद्यस्थिती चिंताजनक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
इमारतीच्या भिंती, छत आणि इतर भागांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात छताला गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. इमारतीच्या काही भागांत तडे अथवा इतर प्रकारची झीज असल्यास त्यातून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष पाहणी करून इमारतीच्या सुरक्षेचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘दुर्घटना झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच उपाययोजना करा’
पंचायत समिती ही ग्रामीण भागातील विकासकामे, विविध शासकीय योजना आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षित वातावरण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. जीर्ण इमारतीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, इमारतीच्या दुरुस्तीबाबत मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र प्रस्तावात काही त्रुटी असल्याने ते प्रस्ताव दुरुस्त करून पुन्हा मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
आता संबंधित विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळून आवश्यक निधी उपलब्ध होतो का आणि प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम कधी सुरू होते, याकडे चामोर्शीकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन इमारतीची पाहणी, आवश्यक डागडुजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने आताच ठोस पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

