
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली नागपूर | दि. २१ ऑगस्ट २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, अडचणी व प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ, नागपूर यांच्या वतीने अप्पर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयासमोर दि. १३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी,गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, ,देवरीचे आमदार संजय पुराम, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष पुसद (यवतमाळ) डॉ. आरती फुपाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश इरपाची यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. भरपावसातही विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी ठामपणे बसून आपल्या शैक्षणिक हक्कांसाठी आवाज उठवला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी ते म्हणाले, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या समस्या व अडचणींचा तोडगा काढण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पोहोचवून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आवश्यक शैक्षणिक सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे केवळ आंदोलन म्हणून न पाहता त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने संवेदनशीलतेने विचार करून शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनस्थळी भेटीनंतर रविभवन, नागपूर येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत चर्चात्मक बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या व समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. मंत्री डॉ. उईके यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेत मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.
या भेटीमुळे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना शासनस्तरावर योग्य व्यासपीठ मिळण्याची आशा निर्माण झाली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

