
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. २० ऑगस्ट : श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त गडचिरोली शहरात भक्तिमय वातावरणात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सुंदरकांड मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या यात्रेत माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी कावडधारकांसोबत सहभागी होत ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भक्तीचा अनुभव घेतला.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. याच भक्तिभावातून आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भगवे ध्वज, आकर्षक फुलांनी सजविलेल्या कावडी आणि ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने शहरातील वातावरण शिवमय झाले.

दुर्गा मंदिरापासून यात्रेला सुरुवात
कावड यात्रेचा शुभारंभ दुर्गा मंदिरापासून करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधी व भक्तिमय वातावरणात कावडधारकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात भगवे ध्वज आणि खांद्यावर सजविलेल्या कावडी घेत भाविकांनी जयघोष करत यात्रेत सहभाग नोंदविला.
सुंदरकांड मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात या कावड यात्रेचे आयोजन केले जाते. यंदाही नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत धार्मिक उत्सवाचा आनंद घेतला.
भक्ती, श्रद्धा अन् उत्साहाचा संगम
यात्रेदरम्यान भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी कावडधारकांसोबत यात्रेत सहभागी होत भाविकांचा उत्साह वाढविला. त्यांच्या सहभागामुळे यात्रेला विशेष रंगत आली.
श्रावणातील या कावड यात्रेमुळे गडचिरोली शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून, शिवभक्तीच्या या सोहळ्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

