
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प; जलसंधारण सप्ताहाचा उत्साहात समारोप
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली दि. २१ ऑगस्ट : जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला नागरिक, युवक-युवती आणि विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ तसेच ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’ हा संदेश देत शहरातून निघालेल्या या वॉकेथॉनमुळे गडचिरोलीत जलसंधारणाचा जागर घडून आला.
इंदिरा गांधी चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. जलसंधारणाचा संदेश देणारे फलक, घोषवाक्ये आणि उत्साही सहभागामुळे वॉकेथॉनला विशेष रंगत आली. पोटेगाव येथील जिल्हा स्टेडियममध्ये या उपक्रमाचा उत्साहात समारोप करण्यात आला.

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान आयोजित जलसंधारण सप्ताहाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने या जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद घाडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक थेंबाचे संवर्धन ही काळाची गरज
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पाण्याचे नियोजन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुषार सिंचन आणि अन्य जलसंधारणाच्या उपाययोजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्हा सुजलाम्-सुफलाम् ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींतून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर यांनीही भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच पाण्याचे संवर्धन आणि योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
रिल्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
दरम्यान, जलसंधारण विषयावरील रिल्स तयार करून पाठविण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महा वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींमधून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
जलसंधारणाचा संदेश जनमानसात रुजवत, ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ने गडचिरोलीत पाणी बचतीच्या लोकचळवळीला नवी ऊर्जा दिली.

