
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
मृतक संजना जाळेच्या कुटुंबीयांना 4आगस्ट पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलेला आहे*
कोरची प्रतिनिधी
कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरणात दोषी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्ष अनिल केरामी यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोटगुल येथील रहिवासी असलेली विद्यार्थिनी संजना हिला तापाची तक्रार असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तपासणीत ती P.V. Positive (मलेरिया) असल्याचे निदान झाले. मात्र, योग्य वेळी उपचार व रेफरल न दिल्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली.
सदर विद्यार्थिनीचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी (3.4) असतानाही तिला आवश्यक ती तातडीची वैद्यकीय मदत व उच्चस्तरीय उपचारासाठी वेळेवर हलवण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच तिचा मृत्यू झाला, असा ठपका स्थानिकांनी ठेवला आहे.
या प्रकरणात OPD रजिस्टरमध्ये फेरफार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. 18 जुलैच्या नोंदीत विसंगती असल्याचे नमूद करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर BNS कलम 105, 106, 238 अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, शासनाने किमान 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून, प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी राज्येचे आरोग्य मंत्री अशोक ऊईके जिल्हा अधिकारी , मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केलेली आहे

