
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/आरमोरी,दि.३० जूलै : “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करत आमदार रामदासजी मसराम यांनी घाटी येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, वसतिगृहातील सुविधा, भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या आणि अपेक्षा त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या तसेच त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करताना काही त्रुटी निदर्शनास आल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या तात्काळ दूर करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार मसराम यांनी दिले.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि सर्व सुविधांनी युक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी स्वतः पुढाकार घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

