
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे मोलाचे योगदान
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२८ जून: भामरागड येथील गुणवंत खेळाडू कु. प्रियांका लालसू ओक्सा हिची सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झाली आहे. क्रीडा कोटा-२०२५ अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदावर तिची वर्णी लागल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रियांकाच्या या यशामुळे दुर्गम भागातील आदिवासी युवक-युवतींसाठी यशाचे नवे दालन खुले झाले आहे.

प्रियांकाला लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या ‘लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी’मार्फत व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रायोजकत्वाची मदत मिळाली होती. ग्रामीण व आदिवासी भागातील क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात अकादमीने बजावलेली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रियांकाने आपल्या अथक मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रियांकाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “प्रियांकाचे यश आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. तिचा हा प्रवास गडचिरोलीतील अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता गाठण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल. ग्रामीण भागातील युवकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आमची संस्था सदैव कटिबद्ध आहे.”
प्रियांकाचे हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, ते तळागाळातील क्रीडा विकासासाठी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. तिच्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

