
पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्याचा उमेदवार इंजि. अतुल देशमुख यांचा निर्धार
गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार इंजि. अतुल देशमुख यांच्या गडचिरोली येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे संपर्क कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमात नमूद आहे.
यावेळी मंचावर पदवीधर उमेदवार इंजि. अतुल देशमुख, राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, राष्ट्र सेवादलाचे विदर्भ अध्यक्ष भाऊराव पत्रे, माजी नगरसेवक राजेश कात्रटवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, कंत्राटी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद शेडमाके तसेच शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना इंजि. अतुल देशमुख यांनी पदवीधर मतदारसंघातील शिक्षण, रोजगार, युवकांचे प्रश्न, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच पदवीधरांच्या विविध सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याची भूमिका मांडली. पदवीधर मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून ते विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच निवडणुकीच्या काळात प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचून संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
अजित शिंदे यांनी पदवीधर मतदारांच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण संवाद आणि संघटित प्रयत्नांची गरज व्यक्त केली. भाऊराव पत्रे यांनी विदर्भातील पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना संघटनात्मक पातळीवर व्यापक जनसंपर्क करण्याचे आवाहन केले.
माजी नगरसेवक प्रा.राजेश कात्रटवार यांनी नागरी भागातील पदवीधर व युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांच्या अपेक्षा शासनापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता व्यक्त केली. राज बनसोड यांनी सामाजिक न्याय, शिक्षण व रोजगाराच्या संधी यांसारख्या विषयांवर भूमिका मांडली. अरविंद शेडमाके यांनी कंत्राटी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करून शिक्षकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. पुंडलिक देशमुख यांनी शिक्षक भारतीच्या माध्यमातून पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या कार्याची माहिती देत उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला शिक्षक, पदवीधर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विष्णु दुणेदार यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश कामडी यांनी केले. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आगामी काळात पदवीधर मतदारांशी संवाद, बैठका व जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

