
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
प्रेस नोट
दि. 06/09/2025

*चामोर्शी :* १४ मार्च २०२४ रोजी शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार (जी.आर.) १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सरळ सेवेत ३० टक्के प्रमाणे समायोजन करण्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु शासनाने आजवर या जी.आर.ची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कंत्राटी कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कासाठी ठिय्या आंदोलनावर बसले. या आंदोलनामुळे रुग्णसेवा ठप्प होऊन रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. शासनाने त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.
आंदोलनाला आझाद समाज पक्ष युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे व जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, तालुका अध्यक्ष नितेश वेसकडे तालुका उपाध्यक्ष राहुल कुकुडकर यांनी उपस्थित राहून शांततेत घोषणाबाजी करून पाठिंबा दिला.
यावेळी कंत्राटी संघटनेचे तालुकाध्यक्ष हेमा नैताम, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम घ्यार, रजनी दिवे, शुभांगी गडकर, अपर्णा बेपारी यांच्यासह शेकडो कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “सरकारने जी.आर. काढून आमच्याशी न्याय होईल अशी अपेक्षा निर्माण केली होती. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. शासनाने तातडीने लक्ष देऊन मागण्यांची पूर्तता केली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल.”
—————————————-
—————————————-

