
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा पुढाकार; २८ ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

चामोर्शी,दि.२५ ऑक्टोबर : वनहक्क दावे, प्रलंबित शेतीपट्टे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (असो.), नवी दिल्ली, जिल्हा गडचिरोली यांच्या पुढाकाराने बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजा भाडभीडी (ब), ता. चामोर्शी येथे वनदावे व प्रलंबित शेतीपट्ट्यांबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शासनदरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनदाव्यांच्या आणि शेतीपट्ट्यांच्या प्रश्नांबाबत शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळावी, तसेच त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती व्हावी, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.

वनहक्क आणि शेतीपट्ट्यांबाबत मिळणार मार्गदर्शन
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी वनजमिनीवरील हक्क, वनहक्क दावे आणि शेतीपट्टे मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, विविध कारणांमुळे अनेक प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्यांची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित विषयांवरील नियमांची माहिती मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून वनदावे आणि प्रलंबित शेतीपट्ट्यांसंदर्भातील विविध प्रश्नांवर माहिती देण्यात येणार आहे.
२३ गावांतील शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या कार्यशाळेसाठी जाणाळा, रेखेगाव, आमगाव, चक नंबर दोन, अनंतपूर, कुदरसी, जंगमपूर, बिलासपूर, हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, राजूर बुजुर्ग, राजूर खुर्द, लाभानतांडा, मक्केपल्ली, चापलवाडा, माडेमुधोली, रेगडी, पोतेपल्ली, माडेआमगाव, विकासपल्ली, घोट आणि पेटतळा या गावांतील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनजमिनीवरील हक्कांसाठी प्रयत्न करणाऱ्या तसेच शेतीपट्टे आणि वनहक्क दाव्यांची प्रकरणे प्रलंबित असलेल्या नागरिकांसाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे संबंधित गावांतील शेतकरी बांधवांनी आपल्या वनदाव्यांशी व शेतीपट्ट्यांशी संबंधित उपलब्ध कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा पुढाकार
या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद किरमे, श्रीकांत वैरागडे, सचिन देशमुख, गुरुदेव सातपुते, प्रकाश कोवासे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

