
एटापल्ली : जिल्हा खणीकर्म योजनेअंतर्गत राजीव गांधी हायस्कूल, एटापल्ली येथील एकूण २१९ विद्यार्थ्यांना सायकली मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या १२४ सायकलींचे वितरण शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करण्यात आले. उर्वरित सायकलींचा पुरवठा लवकरच होणार असून, त्या प्राप्त होताच संबंधित विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन वैभव शिक्षण मंडळाच्या संचालिका जहिरा शेख मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा सरिता राजकोंडावार, माजी ग्रामपंचायत सदस्य उषाताई ठाकरे, शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी मक्सूद शेख सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश दोनतुलवार, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी रविजी रामगुंडेवार, शिक्षण विभाग एटापल्लीचे विषयतज्ज्ञ किशोर खोब्रागडे सर, सुरज उत्तरवार सर, विशेष शिक्षक दलबीर पुगांटी सर, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत कोकुलवार सर आणि प्रभारी मुख्याध्यापक शेख सर उपस्थित होते. यावेळी पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांसमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बारई सर यांनी केले, तर प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत कोकुलवार सर यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देणारी सायकल योजना
प्रास्ताविकातून श्रीकांत कोकुलवार सर यांनी आजपर्यंत मानव मिशन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या विविध शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. तसेच यावर्षी जिल्हा खाणीकर्म योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांप्रती आपली भावना व्यक्त करताना कोकुलवार सर म्हणाले की, विद्यार्थी हेच देशाचे उज्ज्वल भविष्य असून, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येताना लांबचे अंतर, वाहतुकीच्या साधनांचा अभाव आणि इतर अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून मिळणारी सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देणारी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणारी महत्त्वपूर्ण सुविधा आहे.
विद्यार्थ्यांनी या सुविधेचा योग्य उपयोग करून नियमित शाळेत यावे, मन लावून अभ्यास करावा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही अडचणीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडू नये, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षणाचे महत्त्व आणि वाहतूक नियमांवर मार्गदर्शन
माजी नगराध्यक्षा सरिता राजकोंडावार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकासासोबतच जीवनात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ किशोर खोब्रागडे सर यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. सायकल चालविताना सुरक्षिततेची काळजी घेणे, रस्त्यावर शिस्त पाळणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जहिरा शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येणे, नियमित अभ्यास करणे आणि योगासनांना दैनंदिन जीवनात महत्त्व देणे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच गुड टच-बॅड टचबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. सायकलने शाळेत येताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. अभ्यासक्रमासंदर्भात काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वन वैभव शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव बबलू भैय्या हकीम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हाध्यक्षा शाहीनताई हकीम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील १२४ विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे अधिक सोयीचे होण्यास मदत होणार असून, त्यांच्या नियमित उपस्थितीलाही प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील राजेश बारई सर, गोपाला सर, चणकापुरे सर, लिपिक सुलतान पठाण, अशोक गोरे, सुरेश तलांडे आणि सुनीता अर्का यांनी सहकार्य केले.

