
वयाच्या ६५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोककळा

चामोर्शी :चामोर्शी तालुक्यातील मौजा वालसरा येथील प्रतिष्ठित नागरिक, वालसरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव मसाजी भांडेकर यांचे वयाच्या ६५व्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वालसरा गावासह चामोर्शी तालुक्यात शोककळा पसरली असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
केशवराव भांडेकर यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायत प्रशासनासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले. वालसरा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी कार्य केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

पंचायत समिती चामोर्शीचे माजी उपसभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे माजी उपसभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक वाटचालीतून त्यांनी परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
अंत्यसंस्कार आज सकाळी १० वाजता
स्वर्गीय केशवराव मसाजी भांडेकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता पौर नदी, आमगाव (महाल), तालुका चामोर्शी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

