
‘१०० रुपयांची नोट पडली’ म्हणत लक्ष विचलित केले अन् रोकड घेऊन पोबारा; संशयिताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
चामोर्शी :चामोर्शी शहरात बँकेतून काढलेली तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. ‘तुमची १०० रुपयांची नोट मागे पडली आहे,’ असे सांगून एका व्यक्तीचे लक्ष विचलित करत चोरट्यांनी पैशांची पिशवी लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, चामोर्शी पोलिसांनी संशयिताचा फोटो उपलब्ध करून देत त्याची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

शंभर रुपयांच्या नोटेचे आमिष अन् साडेपाच लाखांवर डल्ला!
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती बँकेतून ५ लाख ५० हजार रुपये काढून मोटारसायकलने जात होती. याच दरम्यान एका इसमाने संबंधित व्यक्तीला ‘तुमची १०० रुपयांची नोट मागे पडली आहे,’ असे सांगितले. या बोलण्यामुळे संबंधित व्यक्तीचे लक्ष विचलित झाले. याच संधीचा फायदा घेत संशयिताने पैशांची पिशवी चोरली आणि आपल्या साथीदारासह मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला.
संशयिताचा फोटो उपलब्ध; माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
या प्रकरणातील संशयित व्यक्तीचा फोटो उपलब्ध झाला असून, त्याची ओळख पटविण्यासाठी चामोर्शी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
फोटोतील व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संशयित व्यक्ती आढळल्यास स्वतःहून धोकादायक कारवाई करण्याऐवजी सुरक्षित अंतर राखून पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन
बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निष्काळजीपणा करू नये. ‘पैसे पडले आहेत’, ‘नोट खाली पडली आहे’ किंवा अन्य कोणतेही कारण सांगून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झाल्यास सतर्क राहावे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे, तसेच संशयिताचा फोटो जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी :
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे : ९८२३९५०६४५
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बनसोडे : ९५५२५०९६९०
संशयिताबाबत कोणतीही माहिती असल्यास वरील क्रमांकांवर पोलिसांशी संपर्क साधावा.

