
वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन व १०० टक्के वेतन अनुदानाच्या मागण्यांवर होणार चर्चा; जिल्हा सचिव सुनिल गेडाम यांचे आवाहन

नितेश गट्टीवार|गडचिरोली
(चामोर्शी): ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना एनजीपी ५८२५, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता चामोर्शी येथील बालाजी सभागृह, गडचिरोली रोड येथे जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हा सचिव सुनिल गेडाम यांनी केले आहे.

हा मेळावा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून राज्य सरचिटणीस दयानंदजी एरंडे तसेच नागपूर विभागीय अध्यक्ष ठाकूरदास गव्हारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी मागण्यांचा एल्गार
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि त्यांच्या हक्कांच्या मागण्यांवर मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नागरिक व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, तसेच निवृत्ती वेतन व उपदान लागू करावे, अशी प्रमुख मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू असलेली लोकसंख्या, उत्पन्न व वसुलीची अट पूर्णतः रद्द करून १०० टक्के वेतन अनुदान देण्यात यावे, अशीही महत्त्वपूर्ण मागणी मांडण्यात येणार आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुढील काळातील संघटनात्मक भूमिका व आंदोलनाची दिशा याबाबतही मेळाव्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
मेळाव्याच्या आयोजनासाठी जिल्हा सचिव सुनिल गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष योगेश ढोरे, राज्य सदस्या वैशाली तावाडे, जिल्हा संघटक फालचंद जांभूडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप तूपट, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश सिडाम, महिला प्रसिद्धी प्रमुख गीताताई कुनघाडकर, जिल्हा सदस्य संतोष यादव, रवींद्र सेगम, भाऊराव निकोडे तसेच चामोर्शी तालुका अध्यक्ष कृष्णा लांबाडे व सचिव पुरुषोत्तम गांदरलावर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना संघटित ताकदीने पुढे नेण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा सचिव सुनिल गेडाम यांनी केले आहे.

