
पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट; तालुका कृषी अधिकारी वैभव उत्तरवार यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी), ०२ ऑक्टोबर : पावसाने दडी मारल्याने चामोर्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची यंत्रणा आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली असून, विविध गावांमध्ये शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण आणि नुकसानीच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली आहे.

तालुका कृषी अधिकारी वैभव उत्तरवार यांनी स्वतः शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी केली.
यावेळी पिकांची वाढ, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती तसेच पावसाअभावी जमिनीवर पडलेल्या भेगा यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कमी पावसाचा पिकांवर झालेला परिणाम आणि आगामी काळात होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानीचाही आढावा घेण्यात आला.
शेतकऱ्यांशी थेट संवाद; अडचणी जाणून घेतल्या
पाहणीदरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. पिकांचे नुकसान, शेतातील परिस्थिती आणि पीकस्थितीची वस्तुनिष्ठ नोंद करण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी पंचनाम्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीसाठी आवश्यक नोंदी आणि कागदपत्रांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे.
“नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करून शासनस्तरावर पाठपुरावा”
तालुका कृषी अधिकारी वैभव उत्तरवार यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करून शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी विभागाची यंत्रणा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तव शासनाच्या निदर्शनास येण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून प्रत्यक्ष पीकस्थितीची पाहणी आणि नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण सुरू झाल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने या कार्यवाहीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

