
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : यशोदीप संस्था संचालित केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी येथील तीन विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय भारत’ यांच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पवन रमेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे.महाविद्यालयातील बी.कॉम. तृतीय वर्षाच्या रिया कुणघाडकर व माधुरी मंडल तसेच एम.कॉम. द्वितीय वर्षाचा गुरुदेव सोमनकर यांची या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी निवड झाली. २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चेन्नई येथील व्हीआयटी (VIT) चेन्नई येथे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन MY Bharat Chennai आणि VIT Chennai यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
देशाच्या विविध भागांतील युवकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाकडून विविध राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

