
पत्रकार परिषद, प्रशिक्षण शिबिरे व लोकहिताच्या उपक्रमांसाठी स्वतंत्र जागेची मागणी; आमदार निधीतून आर्थिक तरतुदीचे आवाहन
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
(चामोर्शी),दि.२७ सप्टेंबर :

चामोर्शी तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचा व मोठा तालुका असून विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य आणि विकासात्मक घडामोडींचे केंद्र आहे. या भागातील जनतेचे प्रश्न प्रशासन व शासनाच्या निदर्शनास आणून देत ते प्रश्न जनतेच्या वतीने मांडणाऱ्या पत्रकारांसाठी मात्र चामोर्शीत आजही स्वतंत्र पत्रकार भवन उपलब्ध नाही. त्यामुळे “पत्रकारांच्या हक्काच्या जागेसाठी आता पत्रकार भवन हवेच” अशी मागणी पुढे आली आहे.
या मागणीसाठी पत्रकार सेवा प्रतिष्ठान, चामोर्शी यांच्या वतीने दि.२७ सप्टेंबर रोजी चामोर्शी येथे गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन देण्यात आले. चामोर्शी येथे सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे.
पत्रकारांसाठी हक्काचे व्यासपीठ आवश्यक
तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य व शिक्षणातील अडचणी, विकासकामांतील त्रुटी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र पत्रकार परिषदा, बैठका, प्रशिक्षण शिबिरे, चर्चासत्रे तसेच सामाजिक व लोकहिताच्या उपक्रमांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने पत्रकारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे चामोर्शी तालुका मुख्यालयात पत्रकारांसाठी स्वतंत्र, प्रशस्त आणि सुसज्ज भवन उभारणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार निधीतून आर्थिक तरतुदीची मागणी
पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून किंवा शासनाच्या संबंधित योजनेतून आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात यावी, तसेच भवनासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या भवनात पत्रकार परिषद, बैठका, प्रशिक्षण शिबिरे, चर्चासत्रे आणि सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही प्रतिष्ठानने केली आहे.
“लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्यासाठी पत्रकारांना हक्काचे आणि स्वतंत्र व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. चामोर्शी येथे पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा,” अशी अपेक्षा पत्रकार सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी पत्रकार सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद खोबे, सचिव अरुण गव्हारे, कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार, उपाध्यक्ष श्रावण वाकोडे, धनराज वासेकर, कोषाध्यक्ष मारोती बारसागडे, सहसचिव प्रफुल कोटांगले, सदस्य हस्ते भगत व पुंडलिक भांडेकर आदींच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले.

